भारतीय मतदारांनो, स्वत:मध्ये हे बदल कराच!

कार्यक्षम आणि उत्तरदायित्व स्वीकारणारे लोकप्रतिनिधी हवे असल्यास भारतीय मतदारांनी मतदान करतेवेळी आपल्या मानसिकतेत आवश्यक बदल करायला हवा.

आपण जोपर्यंत जबाबदारीने मतदान करत नाही तोपर्यंत आपण समृद्ध होऊ शकत नाही आणि आपल्या आधीच्या पिढीने ज्या स्वातंत्र्याचे स्वप्न पाहिले त्या स्वतंत्र राष्ट्रात आपण वावरू शकत नाही.

२०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकांना आता वर्षही उरलेलं नाही. सर्व राजकीय पक्ष आता लोकसभेत सर्वाधिक जागा प्राप्त करण्यासाठी निवडणुकीच्या प्रचार मोहिमेच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत. पूर्वपरंपरा लक्षात घेता, यंदाही आपल्या संसदेत अनेक गुन्हेगार आपले प्रतिनिधी बनून प्रवेश करतील. जर भारतीय मतदारांनी मतदान करतेवेळी सात महत्त्वाचे बदल केले, तर हे थांबू शकते.

१. धर्म अथवा जातीच्या नावावर मत देऊ नका.

निवडणुका या धर्मनिरपेक्षपणे लढल्या जायला हव्या. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार, खरे तर नेत्यांनी धर्माच्या नावावर मत मागणे बेकायदेशीर आहे. मात्र, जोवर आपण धर्म अथवा जातीच्या नावावर मत देणे थांबवणार नाही, तोवर छुपेपणाने राजकीय पक्ष- धर्म आणि जातीनुसार मतांचा बाजार भरवतच राहतील. धर्म अथवा जातीच्या मुद्द्याला अनुसरून मतदान करत नंतर रस्ते, वीज आणि पाणी या मागण्या करणे योग्य नाही.

२. भावनांना बळी पडू नका.

लोकशाहीत, आपण आपले प्रतिनिधी निवडतो. आपण कर भरतो. करापोटी भरलेल्या या पैशातून लोकप्रतिनिधींनी लोकोपयोगी ठरणारी कामे करणे अपेक्षित असते. प्रतिनिधी निवडणारी खरी ताकद आपल्या हातात असूनही आपण भावनांना बळी पडतो आणि तार्किक विचार करत नाही. आपल्या विचारप्रणालीवर प्रामुख्याने भावनांचा पगडा असतो आणि त्यात तर्कशुद्ध विचार केला जात नाही.

emotion

३. राज्यघटनेबाबत अज्ञानी राहू नका.

भारतीय राज्यघटना गुंतागुंतीची, समजण्यास अवघड आहे, असे आपण मानतो. आपले मूलभूत हक्कही आपल्याला ठाऊक नाहीत. आपण अनेकदा नेते चांगले असणे किती महत्त्वाचे आहे, याविषयी बोलतो, पण आपल्याला त्यांच्यात कोणते गुण असायला हवे, हे माहीत नसते. चांगल्या भवितव्यासाठी, आपल्याला राज्यघटनेची किमान माहिती असणे आवश्यक आहे.

Preamble

४. उमेदवाराविषयी माहिती करून घ्या.

उमेदवाराविषयी माहिती असल्यास थेट निवडणूक निर्णयावर परिणाम होऊ शकतो. ज्या माहितीच्या आधारे आपण योग्य निवड करू शकतो, अशी उमेदवाराविषयीची महत्त्वाची माहिती सर्वच राजकीय पक्ष परस्परांच्या संगनमताने दडवून ठेवतात. निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसे आपले प्रतिनिधी बनू इच्छिणाऱ्या स्थानिक तसेच राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला तुमच्या उमेदवाराविषयी फारशी माहिती नसेल तर तुम्ही Association of Democratic Reforms या वेबसाइटवर जाऊ शकता.

candidate

५. तुमचे प्राधान्यक्रम निश्चित करा.

आपण आपल्या जीवनाचे प्राधान्यक्रम जसे निश्चित करतो, तसे मतदार म्हणूनही तुम्ही तुमचे प्राधान्यक्रम निश्चित करायला हवे. राजकारणाचा जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावर परिणाम होतो. हे लक्षात घेऊन आपल्या राजकारण्यांकडून आपल्याला वास्तववादी अपेक्षा ठेवणे आवश्यक आहे. मतदार म्हणून नको त्या आश्वासनांना थारा न देणे, नागरी प्रश्नांना सर्वाधिक महत्त्व मिळणे, पूर्ती न झालेल्या आश्वासनांबाबत राजकीय पक्ष, नेते, उमेदवार यांना जाब विचारणे आवश्यक आहे.

६. स्वत:चे राजकीय मत विकसित करा.

तुमचे नेते तुम्हाला काय सांगतात यावर विश्वास ठेवणं थांबवा आणि तथ्य, आकडेवारी आणि अनुभव यांच्या आधारे स्वत:चं मत बनवा. माहिती असलेला मतदार राजकारण्यांना धारेवर धरत जबाबदाऱ्यांसाठी उत्तरदायी ठरवतो. योग्य माहितीच्या आधारे प्रश्न उपस्थित झाल्याने भ्रष्ट आणि शक्तिशाली राजकारणी (काही वेळा त्यांची मुलंही) काहीवेळा गजाआड गेल्याची उदाहरणेही पाहायला मिळतील.

७. चिरीमिरी देणाऱ्यांना मत विकू नका.

अनेक राजकीय पक्ष मतदारांना पैसे, जेवण, मद्य, भेटवस्तू देऊन मत विकत घेण्याचा प्रयत्न करतात. अशी चिरीमिरी स्वीकारत त्यानुसार मत देणाऱ्या अप्रामाणिक मतदाराला त्याच्या राजकीय प्रतिनिधीकडून प्रामाणिकपणाची अपेक्षा करण्याचा कोणताही हक्क नाही. जोपर्यंत आपण जबाबदारीने मतदान करत नाही, तोपर्यंत आपण समृद्ध होऊ शकत नाही आणि आपल्या आधीच्या पिढीने स्वतंत्र राष्ट्राचे जे स्वप्न पाहिले होते, ते अनुभवू शकत नाही.