हजारो विद्यार्थ्यांना बेकारीच्या खाईत लोटणारा सरकारचा धोरणशून्य कारभार!

सरकारच्या धोरणशून्य कारभाराने शिक्षण क्षेत्राचा कसा बोऱ्या वाजतो आणि हजारो विद्यार्थी बेकारीच्या खाईत कसे लोटले जातात, हे महाराष्ट्रात बघायला मिळत आहे.

सरकारच्या धोरणशून्य कारभाराने शिक्षण क्षेत्राचा कसा बोऱ्या वाजतो आणि हजारो विद्यार्थी बेकारीच्या खाईत कसे लोटले जातात, याचा नवा नमुना महाराष्ट्रात नव्या ४२ फार्मसी महाविद्यालयांना दिलेल्या परवानगीमुळे बघायला मिळत आहे.

गेल्या काही वर्षांत अभियांत्रिकी, एमबीए, बीएड अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांकडून असलेली वाढीव मागणी लक्षात घेत भारंभार अभियांत्रिकी, एमबीए, बीएड महाविद्यालयांचे पेव फुटले. गल्लीबोळात कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे उगवलेल्या या अभ्यासक्रमांच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह उभे राहिले आणि परिणामी, अभ्यासक्रमांच्या रिक्त जागांची संख्या वाढू लागली. अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या तर निम्म्याहून अधिक जागा रिक्त राहू लागल्या आहेत. अभियांत्रिकी, एमबीए, बीएड-डीएड अभ्यासक्रमांना लागलेली उतरती कळा लक्षात घेता आणि गेल्या तीन वर्षांत फार्मसी अभ्यासक्रमातील रिक्त जागांचे प्रमाण २० टक्क्यांहून कमी असल्याने शिक्षणसम्राटांनी आपला मोर्चा फार्मसी महाविद्यालयांकडे वळवल्याचे स्पष्ट दिसत आहे. यंदा महाराष्ट्रात ४२ फार्मसी महाविद्यालयांना अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेची (एआयसीटीई) मिळालेली परवानगी हे याचेच निदर्शक आहे. सरकारच्या संमतीनंतरच एआयसीटीईकडे मान्यतेसाठी प्रस्ताव पाठवले जातात.

एआयसीटीईच्या माहितीनुसार, गेल्या दोन वर्षांत फार्मसी अभ्यासक्रमाची पदवी प्राप्त केवळ १५ टक्के विद्यार्थ्यांना कॅम्पस मुलाखतीच्या माध्यमातून नोकरी मिळू शकली तर देशभरात २०१६-१७ मध्ये फार्मसीची पदवी प्राप्त केलेल्या केवळ २०.०१ टक्के विद्यार्थ्यांना नोकरी मिळू शकली, तर फार्मसीची पदविका प्राप्त केलेल्या केवळ १३.३६ टक्के विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली. २०१७-१८ मध्ये म्हणजेच गेल्या वर्षी फार्मसी पदवीधारक १४.९६ टक्के विद्यार्थ्यांना तर पदविका अभ्यासक्रमाच्या ७.५९ टक्के विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली. यांतून औषधनिर्माण क्षेत्रासाठी बाजारपेठेत रोजगार संधींची व्याप्ती किती मर्यादित आहे, हे लक्षात येते. असे असूनही, भारंभार फार्मसी अभ्यासक्रमांच्या जागा वाढवणे म्हणजे बेकारांच्या आणखी फळ्या तयार करणे अथवा या वाढीव जागा रिक्त राहतील, याची मानसिक तयारी करणे होय.

सध्या महाराष्ट्रात फार्मसीच्या १९१ पदवी अभ्यासक्र्मांमध्ये १४ हजार २१० प्रवेश क्षमता आहे, तर पदविका अभ्यासक्रमांच्या २७७ महाविद्यालयांतील १७ हजार ३२३ प्रवेश क्षमता आहे. नव्या महाविद्यालयांना मिळालेल्या मान्यतेतून ही प्रवेशक्षमता तीन ते चार हजारांनी वाढेल. तसेच पदवी- पदविका अभ्यासक्रमांच्या वाढीव तुकड्या, पदविका अभ्यासक्रम चालविणाऱ्या संस्थेत पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता देणे आणि पदवी अभ्यासक्रम चालविणाऱ्या संस्थेला पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यास मुभा मिळाली असल्याने प्रवेश क्षमता आणखी तीन-चार हजारांनी वाढेल.

मागणी आणि पुरवठ्याचे व्यस्त प्रमाण झाल्यास बेकारांची फौज कशी तयार होते आणि त्याचा परिणाम म्हणजे विद्यार्थिसंख्येअभावी शेकडो महाविद्यालये कशी बंद पडतात याचे अभियांत्रिकीचे उदाहरण ताजे आहे. २०१६-१७ या वर्षात अभियांत्रिकीच्या पदवी अभ्यासक्रमाच्या सात लाख चौसष्ट हजार विद्यार्थ्यांपैकी केवळ तीन लाख चोवीस हजार विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्या तर अभियांत्रिकीच्या पदविका अभ्यासक्रमाच्या  सहा लाख ७७ हजारांपैकी केवळ एक लाख ५५ हजारांनाच नोकरीची संधी उपलब्ध झाली. हे उदाहरण नजरेसमोर असूनही फार्मसी अभ्यासक्रमाची प्रवेशसंख्या अव्वाच्या सव्वा वाढवून विनाकारण फुगवटा तयार केला जात आहे.

नोकरीच्या संधींचा दुष्काळ असताना विनाकारण वाढीव प्रवेश जागा उपलब्ध करून देत याआधी अभियांत्रिकी, एमबीए, बीएड-डीएड अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान करून घोर फसवणूक झाली होती. आता याच मालिकेत फार्मसी जाऊन बसत आहे. फार्मसीच्या प्रवेशजागा वाढविल्यास नोकरी मिळालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी आणखी घसरण्यास वेळ लागणार नाही.