… दीपक जलाना कब मना है ?

भोवताल कितीही निराशाजनक असला तरी तो बदलण्यासाठी एका मिणमिणत्या पणतीचा मोठा आधार वाटतो. आपले उचललेले पाऊल स्वत:चच नाही तर दुसऱ्याचं जिणंही संपन्न करतो.

अशा अनेक गोष्टी भोवताली घडत आहेत, त्यावर बोलायलाच हवं, लिहायलाच हवं असं तीव्रतेनं वाटतं नि त्याबद्दल अवाक्षर काढू नये, एक अक्षर लिहू नये असंही वाटतं. त्यातील काही वारंवार मनात उमटणारे प्रश्न म्हणजे, आयुष्यात शांततेची गाज अजून कशी ऐकू येऊ नये? वर्षानुवर्षं इतकं कष्ट करूनही समृद्धीच्या पाऊलखुणाही का बरं दिसू नयेत? आयुष्यात स्थैर्य, समृद्धी आणि शांतता नक्की कधी मिळते? नक्की कधी मिळायला हवी?

मी नाही रमत कल्पनारंजनात, ज्यात जादुई छडीने बदल झाल्यासारखं जगणं सोप्पं, छान-छान होऊन जाईल, पण आयुष्य चांगल्या दिशेने दहा पावलं तरी पुढे जावं, याकरता आणखी किती वाट पाहायची? निदान प्रगतीच्या मार्गावरचा प्रवास तरी सुरू व्हावा. ज्या प्रवासाची गती तितकीशी वेगवान नसली तरी चालेल, पण अस्तित्वच गिळून टाकणारे मोठाले खड्डे तरी मार्गावर नसावेत. सुरू व्हावा असा प्रवास, जो कधी ना कधी आपल्याला समृद्धीच्या शिखरापर्यंत पोहोचवेल. देशासोबत देशातील प्रत्येक व्यक्तीही मोठी होईल, समृद्ध होईल, आनंदी होईल.

मला डोळे दीपवणारा प्रकाश नकोय, हवीय मिणमिणती पणती. जी असेल ठाम, शांत, संयत. माझा आणि माझ्यासोबत प्रत्येकाचा भवताल उजळून टाकणारी. अशा वेळी आठवते हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेच्या ओळी…

किंतु ऐ निर्माण के प्रतिनिधि, तुझे होगा बताना
जो बसे हैं वे उजड़ते हैं प्रकृति के जड़ नियम से
पर किसी उजड़े हुए को फिर बसाना कब मना है
है अंधेरी रात पर दीपक जलाना कब मना है।

देशातील प्रत्येकाच्या मनात ही शांत, स्निग्ध प्रकाशाची आस जागी झाली तर आपल्या सर्वांचं अंगण नितळ, सोनसळी उन्हानं व्यापून जाईल.