प्रत्येक भारतीयाने राजकीयदृष्ट्या सक्रिय का असायला हवे, यामागची ही ७ कारणे!

सरकारवर वचक ठेवायचा असेल आणि सरकारची धोरणे जनहितार्थ असावी, असे वाटत असल्यास जनतेने राजकीय प्रक्रियेत सक्रियरीत्या सहभागी व्हायला हवे.

राजकारण हे बव्हंशी नैराश्य आणणारे, घाणेरडे आणि कर्णकटू असते, इतके की, समर्पित भावनेच्या नागरिकांमध्येसुद्धा सरकारबाबत निराशेची भावना बळावते आणि ते गप्प बसण्याचा पर्याय निवडतात. मात्र, मूक बहुसंख्य असण्याऐवजी, आपल्याला नेमके उलट वागण्याची आवश्यकता आहे- आपण अधिक माहितीपूर्ण असण्याची आणि सक्रिय नागरिक बनण्याची आवश्यकता आहे आणि आपला आवाज ऐकला जाईल, याची काळजी घेणेही गरजेचे आहे.

आपण लोकशाहीत वावरतो, हे आपलं सुदैव. जगाच्या पाठीवरील प्रत्येकी १० नागरिकांपैकी केवळ चौघांनाच ही चैन अनुभवता येते. म्हणून, आपण राजकीय प्रक्रियेत सहभागी होणे महत्त्वाचे ठरते. आपण राजकीयदृष्ट्या सक्रिय असायला हवे, यामागची ही सात कारणे-

१. आपण कष्टाने कमावलेला पैसा सरकार मनमानीपणे खर्च करते.

आपल्यापैकी अधिकाधिक जनतेने सर्व प्रकारचे कर भरावेत, हा सरकारचा प्रयत्न असतो. मग तो आयकर असो, अथवा जीएसटी, अबकारी कर, सीमा शुल्क, मालमत्ता कर, स्वच्छ भारत अधिभार, शैक्षणिक अधिभार आणि इतर अनेक कर. सर्वसामान्य भारतीय हा गरीब आहे आणि वर्षाकाठी तो केवळ १.२ लाख रुपये कसेबरे कमावू शकतो, याकडे सरकार सोयीस्करपणे दुर्लक्ष करते. प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही काहीतरी खरेदी करता, तेव्हा तुम्ही कर भरता आणि बऱ्याचदा ते तुमच्या लक्षातही येत नाही. जर आपण राजकीयदृष्ट्या सक्रिय राहिलो नाही, तर राजकारणी आणि नोकरशहा आपला पैसा त्यांच्या व्यक्तिगत फायद्यासाठी उपयोगात आणतील.

२. आपणच आपल्याला गरिबीच्या आणि अज्ञानाच्या खाईतून बाहेर काढायला हवे.

भारत हा श्रीमंत देश आहे, मात्र भारतीय गरीब आहेत. आपल्याला ठाऊकही नाही, इतकी संपत्ती आपल्यापाशी आहे. आपल्या संपत्तीतील मोठ्या भागावर सरकारचे नियंत्रण आहे. जमीन, सार्वजनिक उपक्रम, खनिजे, दूरसंचार, स्पेक्ट्रम अशा या देशाच्साया र्वजनिक संपत्तीत श्रीमंत अथवा गरीब असलेल्या प्रत्येक भारतीयाचा वाटा आहे. या संपत्तीचा परतावा जर प्रत्येकाला मिळाला तर आपल्याला गरिबी दूर करता येईल आणि भारताला उत्कर्षाच्या मार्गावर पोहोचवता येईल. राजकीयदृष्ट्या आपण सक्रिय राहिलो तर आपण सरकारकडे आपली संपत्ती परत देण्याची मागणी करू शकतो.

३. सहभागाने लोकशाही मजबूत बनते.

जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत आपण आपली भूमिका बजावली नाही, तर आपण आपली ताकद आणि आपले विशेषाधिकार आपणच कमी करत आहोत. एक मत अथवा उपस्थित केलेला एक प्रश्न बदल घडविण्यास पुरेसा ठरतो. कदाचित, बदल घडणारही नाही. पण तरीही, कुठल्याही मार्गाने, आपण या प्रक्रियेत सहभागी व्हायला हवे.

राजकारणात सहभागी होण्यास नकार दिल्याने अशी शिक्षा मिळते की कनिष्ठ आपल्यावर शासन करतात – प्लेटो

४. अद्ययावत माहिती असल्यास आपण राजकारण्यांना उत्तरदायी बनवतो.

सर्व माहिती असलेला मतदारच नेहमी राजकारण्यांना धारेवर धरतो. अशी कितीतरी उदाहरणे घडतात जेव्हा भ्रष्ट आणि शक्तिमान राजकारणी (काही वेळा त्यांची मुलेही) गजाआड धाडली जातात, कारण तुमच्या-माझ्यासारखी सामान्य माणसे त्यांच्या गैरकृत्यांविरोधात वाचा फोडतात.

५. आपल्या भविष्याविषयी टिपण्णी करता यावी म्हणून…

सत्ताधारी लोकांचा आपल्या जगण्यावर मोठा प्रभाव असतो. सरकार परिणामकारक असो वा नयो, आपले वर्तमान आणि भविष्य जेवढे आपण निश्चित करतो, तेवढे ते करतात. आपल्या नियतीला आकार द्यायचा असेल तर आपण राजकीयदृष्ट्या सक्रिय राहायला हवे, कारण काळाच्या मुशीत तावून सुलाखून निघालेला अनुभव हेच कथन करतो, की सत्तालोलूप राजकारणी केवळ स्वत:चाच विचार करतात.

६. चुकीच्या धोरणांची अमलबजावणी थांबविण्यासाठी…

चुकीच्या धोरणांची अमलबजावणी होऊ नये, याकरता सर्वोत्कृष्ट मार्ग म्हणजे अशी धोरणे निर्माण होऊ नये म्हणून आपल्याला अद्ययावत माहिती असायला हवी आणि आपण राजकीयदृष्ट्या सक्रिय असायला हवे. जर सरकार निर्माण करत असलेल्या आणि राबविणाऱ्या आर्थिक आणि सामाजिक धोरणांची माहिती आपल्याला नसेल, तर आपण कधीही चुकीची, वाईट धोरणे राबविण्यापासून सरकारला थांबवू शकत नाही. स्वतंत्र भारताचा इतिहास हा चुकीच्या आर्थिक निर्णयांचा इतिहास आहे आणि केवळ सक्रिय नागरी समाजच हा बदलू शकतो.

७. निर्णयांची इत्यंभूत माहितीच आपल्याला समृद्ध बनवेल.

जर आपण राजकीय प्रक्रियेत पाऊल टाकत योग्य उमेदवाराला आणि धोरणाला मत दिले नाही तर आपण याआधी केलेल्या चुकांचीच पुनरावृत्ती होत राहील आणि गरिबीच्या गर्तेत आपण अधिकाधिक रूतत जाऊ. काय घडत आहे, हे आपण समजून घ्यायला हवे. कुठली धोरणे आपल्याला लाभदायक आहेत, हे शिकायला हवे आणि सक्रियरीत्या आपण त्या धोरणांना उत्तेजन द्यायला हवे, म्हणजे आपण समृद्ध होऊ आणि अशा समृद्ध आणि स्वतंत्र देशात राहू, ज्याचे स्वप्न आपल्या पूर्वजांनी पाहिले होते.