मोडक्यातोडक्या उच्च शिक्षणव्यवस्थेची विषण्ण करणारी कथा!

एकीकडे प्रवेशासाठी टोकाची स्पर्धा, दर्जेदार महाविद्यालयांची वानवा आणि दुसरीकडे उच्चशिक्षितांपुढील बेरोजगारीची समस्या यांत आपलं उच्च शिक्षण गटांगळ्या खातंय.

बारावीची परीक्षा दिलेल्या उमद्या चेहऱ्यांवर नवी स्वप्ने तरळत असतात. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अपेक्षित प्रवेशाविषयीचे एक कुतुहल, जिज्ञासा त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेली असते. करिअरच्या एका महत्त्वाच्या अशा या टप्प्यावर, उज्ज्वल भवितव्याकडे झेप घेऊ इच्छिणाऱ्या या युवावर्गाच्या चेहऱ्यावर भविष्याविषयीची एक भाबडी आशा तरळत असते.

… पण व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांची गुणवत्ता यादी जाहीर होते, आणि हे चेहरे साफ काळवंडून जातात. अपेक्षित अभ्यासक्रम, दर्जेदार महाविद्यालयात प्रवेश मिळेल का, हे प्रश्नचिन्ह, भविष्याविषयीची एक अनिश्चितता त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसू लागते. हे सारे घडतेय देशाच्या उच्च शिक्षणाच्या बिकट बनलेल्या स्थितीमुळे.

उच्च शिक्षणावरून कुणाचाही विश्वास उडावा, अशी आपल्या शिक्षण व्यवस्थेची सद्य परिस्थिती आहे. २०१६-१७ मध्ये १,९०,००० भारतीय विद्यार्थ्यांनी अमेरिकेतील महाविद्यालयांमध्ये ४४ हजार कोटी रुपये खर्च केले. आपल्या देशाची उच्च शिक्षणासाठीची वर्षभराची आर्थिक तरतूद ३० हजार कोटी रुपयांहून कमी आहे. यावरून एक गोष्ट लक्षात येते- ज्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी देश सोडून परदेशात जाणं परवडतं आणि आपलं भविष्य सुरक्षित करता येतं, ते किती भाग्यवान आहेत!

आता आपण लक्षात घेऊयात, आपल्या अव्वल दर्जाच्या शैक्षणिक संस्थांची स्थिती. जर आयआयटी, एनआयटी यांसारख्या संस्थांद्वारे आपले सरकार हुशार विद्यार्थ्यांची काळजी घेते, असं जर तुम्हाला वाटत असेल तर पुढील आकडेवारीही लक्षात घ्या. ऑगस्ट २०१७ मध्ये मनुष्यबळ विकास विभागाने संसदेत दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या केंद्रीय विद्यापीठांमध्ये ५३ टक्क्यांहून अधिक प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. एनआयटीमध्ये सुमारे ४७ टक्के तर आयआयटीमध्ये ३५ टक्क्यांहून अधिक प्राध्यापकांच्या जागा भरलेल्या नाहीत. आणि आपल्याला हेही ठाऊक आहे की, सरकारच्या या अव्वल शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण पूर्ण केल्यावर ही मुलं सुरक्षित भविष्यासाठी काय करतात- देश सोडतात.

आता आपण ज्या विद्यार्थ्यांना दुय्यम दर्जाच्या महाविद्यालयांमध्ये आणि खासगी महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळतो, अशा विद्यार्थ्यांची स्थिती पाहुयात. ‘फिक्की’(फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री)च्या उच्च शिक्षणविषयक अहवालानुसार, ९३ टक्के एमबीए आणि ८० टक्के अभियांत्रिकीचे विद्यार्थी नोकरी करण्यास अपात्र आहेत. अलीकडच्या जागतिक बँकेच्या वार्षिक अहवालानुसार, व्यापारसुलभतेच्या निर्देशांकात १९० देशांमध्ये आपला १५६ वा क्रमांक लागतो. यातून पुरेसे स्पष्ट होते की, बहुसंख्य विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागलेले आहे.

देशभरातील महाविद्यालयांमध्ये विविध अभ्यासक्रम शिकणाऱ्या तीन कोटी विद्यार्थ्यांना आणि जे लवकरच महाविद्यालयांमध्ये प्रवेश करणार आहेत, अशा शाळकरी विद्यार्थ्यांना मला काही प्रश्न विचारावेसे वाटतात-

• उज्ज्वल भविष्याची मागणी नेमकी कधी करावी, असं तुम्हाला वाटतं?

• तुम्हाला जे माहीत असायला हवं होतं, ते प्राथमिक शिक्षणात तुम्हाला शिकवलं गेलं नाही, असं तुमच्या केव्हा लक्षात आलं?

• या देशात दर्जेदार उच्च शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्थांची संस्था १ टक्काही नाही, हे तुमच्या कधी लक्षात आलं?

• नोकरीकरता ज्या संस्थांकडे तुम्ही अर्ज कराल, तिथे तुम्ही नोकरीसाठी पात्र नाही, हे तुमच्या कधी लक्षात आलं?

• तुमच्याकडे पीएच.डी असूनही एका शिपायाच्या नोकरीसाठी तुम्हाला अटीतटीच्या स्पर्धेला तोंड द्यावं लागेल, हे तुम्हाला कधी कळलं?

• स्वत:चा व्यापार सुरू करणं हे अद्यापही धूसर स्वप्न आहे, हे तुमच्या कधी लक्षात आलं?

माझे प्रश्न ज्यांना उद्देशून आहेत, ते तुम्हीही असू शकाल अथवा या निष्फळ व्यवस्थेचे बळी जे आहेत, त्यांना तुम्ही ओळखत असाल, किंवा कदाचित तुम्ही बड्या करिअरमध्ये, सुरक्षित नोकरीत आणि आरामदायी आयुष्य व्यतीत करत असाल.

काहीही असो, प्रवेशाच्या, नव्हे नकाराच्या यादीकडे पाहतील, अशा भावी लाखो युवावर्गाच्या आणि मुलांच्या भविष्याचा क्षणभर विचार करा. या सर्व गोष्टी सुधारतील तेव्हा सुधारू देत, हा विचार करत वाट बघण्याची माझी तयारी नाही. मला ठाऊक आहे, खूप उशीर होण्याआधी पावले उचलली आणि वेगळा विचार केला तरच गोष्टी सुधारतील. म्हणून, हा घोळ कसा निस्तरता येईल याचा विचार करूयात. आपल्याला एकत्रितपणे काहीतरी करता येईल का, तेही बघुयात.

ज्येष्ठ वैज्ञानिक आणि माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या शब्दांत सांगायचे तर- आपल्या मुलांच्या चांगल्या भविष्याकरता आपण आपल्या वर्तमानाचा त्याग करूयात.