सामान्य मतदारांचे मतदानाचे निकष..

आपले मत नक्की कुठल्या निकषांवर द्यायचे, याबाबत सर्वसामान्य मतदाराच्या मनात निवडणुकीच्या वेळेस द्विधा मनस्थिती असते. त्याविषयी...

निवडणुका जवळ आल्या की, मतदारांना चांगले दिवस येतात. पाच वर्षांत पहिल्यांदा मतदारांना लोकप्रतिनिधींचे चेहरे दिसतात. आपले मत किती अमूल्य आहे, याची कल्पना मतदारांना यायला लागते. मतदानाचा दिवस जसजसा जवळ येऊ लागतो, तशी त्याच्या मनात वेगवेगळी चक्रे सुरू होतात. मत देताना नक्की कुठले निकष लक्षात घ्यायचे?

व्यक्ती, पक्ष, तुम्हाला पटणारी विचारप्रणाली, दुसऱ्यापेक्षा पहिला बरा हा विचार, स्थिर सरकार, धोरणांची दिशा, निवडणुकीच्या आधी वा नंतर होणाऱ्या आघाड्या… असे बरेच मुद्दे त्यांच्या मनात पिंगा घालू लागतात. यांत त्याला महत्त्वाचे वाटणारे मुद्दे पडताळत तो मतदानाचा विचार करू लागतो. आपण फसले जाऊ नये, ही दक्षता त्याच्या परीने तो घेत असतो खरा, पण मतदान केल्यानंतर आलेल्या रिकामपणात विचार करताना सारेच पक्ष एकसारखे, सारेच राजकारणी एका माळेचे, मतदान करून काय फायदा झाला, उमेदवार जिंकला काय की हरला काय, माझ्या आयुष्यात काय फरक पडतो? शेवटी हरतो तो सामान्य माणूसच, असं काहीसं त्याला वाटायला लागतं.

सर्वसामान्य व्यक्ती मतदान करताना जे निकष लावते, त्यातील काही निकष लक्षात घेऊयात-

  • मतदान व्यक्तीला की पक्षाला?

जर उमेदवाराची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असली तर त्या व्यक्तीला नाकारलं जायला हवं. अशा उमेदवाराला तिकीट देण्याची किंमत त्या राजकीय पक्षालाही मोजायला लावायला हवी. एखाद्या राजकीय पक्षाकडे बघून मत देणारा मतदार, पक्षाची विचारप्रणाली, त्याची ध्येय-धोरणे, आश्वासने बघून मत देतो. पण हे मत देताना त्याला हेही कळत असते की, प्रत्येक पक्षाची ध्येय धोरणे लवचिक असतात. आश्वासने तर कुठलाच पक्ष पूर्ण करत नाही. सर्वसामान्य मतदार म्हणूनच बहुतांश वेळा स्थानिक स्तरावर व्यक्ती बघून आणि लोकसभा, विधानसभांच्या निवडणुकांच्या वेळेस पक्ष बघून मत देतो.

  •  यांपैकी नाही, अर्थात ‘नोटा’चा पर्याय

सारे राजकीय पक्ष ‘एकाच माळेचे मणी’ हे लक्षात घेत अलीकडे ‘वरीलपैकी कुणीच नाही’ म्हणजेच ‘नोटा’चे बटण दाबायचा विचार करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे. मात्र, ‘नोटा’द्वारे कुठलाही उमेदवार तुम्हाला पसंत नाही, हे लक्षात येते, त्या पलीकडे त्याद्वारे कोणताही व्यवस्थात्मक बदल घडून येत नाही. नोटाला बहुमत मिळणे शक्य नसते.

  •  कमी वाईट उमेदवार

एखाद्या वाईट उमेदवारापेक्षा त्याहून कमी वाईट उमेदवाराला अनेकजण आपली पसंती देतात. कधी कधी सारेच पक्ष सारखे म्हणत नव्या पक्षाला किंवा अपक्षांना मत देण्याकडेही सर्वसामान्यांचा कल असतो. मात्र, त्यांना मनातून रुखरुख वाटत राहते की, आपण ज्या कमी लोकप्रिय असणाऱ्या व्यक्तीला मतदान केले, तो हरला तर आपले मत वाया तर जाणार नाही?

  • विचारप्रणाली

एखाद्या पक्षाच्या मूल्यप्रणालीवर सर्वसामान्य कुटुंबाचा विश्वास असतो. सामान्य मतदार खरे तर हेही जाणून असतो की, कोणतेच पक्ष मूल्यांना धरून वागत नाहीत, आश्वासने पाळत नाहीत. पक्षांची विविध धोरणे आणि या धोरणांची प्रत्यक्ष अमलबजावणी यांच्यात जमीनअस्मानाचे अंतर असते. पण तरीही, विचारप्रणालीच्या निकषांवर ‘त्यातल्या त्यात आपला’ असे मानत त्या उमेदवाराला मत देण्याचा कल सर्वसामान्य मतदारांमध्ये दिसून येतो.

  • युती, आघाडी

निवडणुकीनंतर सरकार स्थापनेसाठी जी युती होते अथवा आघाडी स्थापन होते, त्या संबंधीच्या शक्यता लक्षात घेतही मतदार मत देतात. कधी मतदार अल्प जागा मिळाल्याने आघाडी करून बनवलेले सरकार टिकत नाही आणि पुन्हा निवडणुकांची नामुश्की ओढवते, हे लक्षात घेत लहान पक्षांपेक्षा जे बलाढ्य पक्ष निवडून येण्याची शक्यता आहे, त्यांना मत देतात. तर कधी एखादा पक्ष तुल्यबळाचा विरोधक नसल्याने शेफारला असेल, धोरणांमध्ये अरेरावी करत असेल, तर त्याचे बळ कमी करून विरोधकांच्या पारड्यात मत टाकण्याचा सावध पवित्रा मतदार घेतात.